Featured Post

The House That Waited

                                                        Dust, Dreams and Memories                                                           ...

03 August 2020

जादूई कारंजा??


नमस्कार! खालील स्टोरी वाचण्यास सुरू करण्यापूर्वी, बस इतकच बोलू इच्छिते की, मराठी लेखनाचा हा माझा पहिला प्रयत्न आहे, म्हणून काही चुकी झाल्यास माफी आणि तुमच्याकडे जर काही प्रश्न किंवा माझ्यासाठी काही सूचना व टिपण्या असल्यास, तुम्ही खालील 'comment box' मध्ये मन मोकळं करून लिहू शकतात. जर तुम्हाला खालील गोष्ट आवडली तर तुमच्या मित्रां बरोबर आणि परिवाराबरोबर नक्कीच शेयर करा. अजून एक गोष्ट म्हणजे , मला माझ्या भावाचे आभार मानायचे आहेत, नेहमी माझा साथ देण्यासाठी,मला पाठिंबा देण्यासाठी. थेंक यु सो मच दादा - ज्याने मला ही कथा मराठीत पुन्हा लिहिण्यास मदत केली. सर्वांनी सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.


मी कामावरून नुकतीच सुटून माझी नेहमीची बस पकडली. खिडकीच्या बाजूच्या सीट वर बसून मी बाहेर पाहत होती. ख्रिसमस चा सण काही दिवसांवर होता म्हणून रस्त्यावर लोकांची वर्दळ होती. माझ्या ऑफिसपासून काही अंतरावर एक मोठे कारंजे होते. तिथे नेहमी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होत असे. आज त्याच गर्दीत मी एका लहान मुलीला बघितले. इतक्या सगळ्या लोकांच्या गर्दीत सुद्धा ती एकटी शांत उभी होती. तिने सफेद रंगाचा छानसा फ्रॉक घातला होता, त्या फ्रॉक वर हलक्या निळ्या रंगाच्या रिब्बीन्स होत्या. तिचे केसं पोनीटेल मध्ये बांधलेले होते व तिच्या डोक्यावर निळ्या रंगाचा हेअर-बेंड होता. इतक्या गर्दीत ही त्या चिमुकलीने माझें लक्ष वेधून घेतले. तिच्याबरोबर तिची आई किंवा कोण मोठे आहे हे बघ्याण्यागोदरच माझी बस पुढे निघून गेली. ख्रिसमस चा सण काही दिवसांवर होता म्हणून कदाचित ती चिमुकली तिकडे सहलीला आली असावी असा विचार माझ्या मनात आला. ट्रॅफिक असल्यामुळे त्या दिवशी मला घरी पोहचण्यास थोडा उशीर झाला होता, म्हणून जास्त विचार न करता मी घरी येऊन माझी कामे उरकली, जेवली आणि झोपी गेली.



दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर मी घरी येण्याकरिता माझी नेहमी ची बस पकडली. त्या चिमुकली बद्दल मी विसरूनच गेली होती, पण आज पुन्हा जेव्हा माझी बस त्या कारंज्याजवळून गेली तेव्हा त्या चिमुकलीला मी पुन्हा पाहिले. ह्यावेळी ती कारंज्याच्या कठड्यावर आपले पाय हलवत, इकडे तिकडे बघत, वर खाली पाहत, मधेच हसत, हातवारे करत बसली होती. तिच्या छोट्याश्या हातात तिने घट्ट मुठ्ठीत काहीतरी पकडून ठेवलेले. मी माझे डोळे बारीक करून बघतच असताना बस पुढे सरकावली. ती चिमुकली मला आजही दिसली ही किती आश्चर्याची गोष्ट होती. मी तिला आज ही त्याच जागी पाहीन हा मी विचार सुद्धा केला नव्हता. नेहमी प्रमाणे मी घरी पोहचली, माझी कामे उरकली, आणि जेवायला बसली असतानाच मला गालातल्या गालात हसू आले आणि माझ्या मनात विचार आला, "उद्या पुन्हा जर मी त्या चिमुकलीला पाहिले, तर मी नक्कीच तिचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीन". बस मधून उतरून तिच्याकडे जाणे मला योग्य वाटले नाही. आम्ही अनोळखी होतोच आणि जर तिची आई किंवा वडिल तिच्यासोबत असतील तर त्यांच्या मनात माझ्या विषयी काहीतरी विचित्र असा विचार यायचा, हे ध्यानात ठेवून बसमधून उतरून तिच्याकडे जाण्याचा माझा विचार मी सोडूनच दिला.
                
काल तर मी तिला विसरलेली पण आज मात्र पूर्ण दिवस माझ्या मनात तिचेच विचार होते. आज पुन्हा घरी जाताना ती मला दिसेल की नाही? ह्याच विचारात माझे मन गुंतलेले होते. संध्याकाळी ऑफिस सुटलं, मी माझी नेहमी ची बस पकडली, पटकन जाऊन खिडकीच्या बाजूची सीट ही घेतली आणि बस कधी कारंज्याजवळील बस स्टॉप वर पोहोचतेय ह्याची मी वाट पाहू लागली. आश्चर्याची बाब म्हणजे आज ही ती चिमुकली मला कारांज्याच्या जवळ कठड्यावर बसलेली दिसली. तिला बघताच माझ्या चेहऱ्यावर एक स्मिथ हास्य आले. तिचे लक्षवेढून घेण्यासाठी मी तिच्या दिशेने माझे हात हलवत इशारे करू लागली. तिचे लक्षवेढून घेण्यासाठी, माझ्यात असलेली आतुरता आणि उत्साह, माझ्या शारीरिक हावभावातून स्पष्ट दिसत होती. दुर्दैवाने, मी तिचे लक्ष वेधूच शकली नाही. "कदाचित मला बस मधून उतरायला पाहिजे होते" हा विचार करत, निराश होऊन , मनात खंत घेऊन मी घरी पोहचली. उद्या मी नक्कीच तिचे लक्ष वेधून घेइन, हा विचार करत मी माझी कामे आटपली, कसे मी तिचे लक्ष वेधू शकते हाच विचार करत मी जेवली, आणि झोपताना सुद्धा ह्याच विचारात माझें मन रमले होते. ती कोण आहे, तिचे नाव काय, ती कुठे राहते, ती त्याच ठिकाणी रोज का येते, ह्याची कसली ही मला काहीही कल्पना नव्हती, तरीसुद्धा रोज तिला त्या ठिकाणी बघून माझें मन आनंदीत होई. माझ्या मनाला, ती कोण आहे आणि ती का रोज मला दिसते हे प्रश्न सतत सतावत होते. तिच्याबद्दल माझे काही चुकीचे हेतू नव्हते, परंतु त्या चिमुकलीला रोज छान छान रिब्बीन्स असलेले फ्रॉक, डोक्यावर हेअर-बेंड, आणि तिच्या छोट्याश्या हातात घट्ट मुठ्ठीत काहीतरी पकडून रोज त्याच वेळेस, त्याच ठिकाणी, कारंज्याच्या कठड्यावर बसलेले बघून माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले.



उद्या नाताळ, गेले काही वर्ष मी नाताळच्या, म्हणजेच, सुट्टीच्या दिवशीसुद्धा काम करत आली होती, पण ह्या वर्षी मी नाताळची सुट्टी टाकली. जास्त विचार न करता मी ह्यावेळेस नाताळची सुट्टी टाकून, सकाळच्या वेळेस घरची कामे उरकून, दुपारच्या वेळेस त्या चिमुकलीसाठी काहीतरी भेटवस्तू आणायला जाईन, मग संध्याकाळदरम्यान त्या कारंज्याजवळ जाऊन तिची वाट पाहीन, ती चिमुकली आली की तिला भेटवस्तू देईन, तिच्याबरोबर काहीवेळ गप्पामारीन, मग घरी येऊन जरा आराम करिन असे ठरवले. तिला भेटण्याच्या उत्सुकतेने माझे मन बहरून गेले होते. तिला काय भेटवस्तू देऊ शकते, हा विचार करत असताना मनात आले की, ती इतकुशी चिमुकली, मग तिला चिमुकलीशी, अगदी तिच्यासारखी गोंडस असणारी, फ्रॉक घालणारी, डोक्यावर एक नाही तर दोन पोनीटेल आणि एक सुंदर हेर-बेंड असणारी बाहुली भेट म्हणून द्यायला हवी. माझे मन इतके उत्सुक होते की त्या वेड्याला काही झोपच येईना. माझे वेडे मन उद्याच्याच विचारात रमले होते, तेव्हा अचानक मला काही जुन्या गोष्टी आठवल्या..



सहावर्षा पूर्वी माझ्या लाडक्या एबीगेल चा जन्म झाला, मी तिला पाहिल्यांदाच जेव्हा माझ्या कुशीत घेतले होते, तेव्हा अगदी बाहुली सारखी छोटीशी होती ती, मऊ मऊ अशी गुलाबी त्वचा, डोक्यावर एकही केस नव्हता, डोळे ही बंद होते तरी आवाज कुठे झाला की लगेच त्या दिशेने वळायची, नर्सने एका कपड्यात घट्ट बांधून दिले होते तिला, इतकी नाजुक होती ती की अगदी काचेच्या बाहुली सारखी वाटायची. तिला एक क्षणही कधी मी एकटी सोडायची नाही. बसायला, चालायला लागल्यापासून, सारखी माझ्या मागे मागे फिरायची आणि बोलायला लागल्या पासून दिवस रात्र फक्त 'मम्मा मम्मा' करत राहायची. माझ्या लाडक्या एबी चे विचार आणि आठवणीने माझें डोळे भरून आले. डोळ्यात अश्रू घेऊन विचार करता करता कधी झोप लागली, हे मला कळलंच नाही



आज ख्रिसमस चा सण असल्यामुळे मी लवकर उठली आणि माळ्यावर गेलेकाही वर्ष धूळ खात पडत असलेले सजावटीचे सामान घर सजवण्यासाठी बाहेर काढले. अगदी पहाटेपासून घर सजवायला घेतले. नकली फुले, पाने, रंगीबिरंगी पट्ट्या, तारे, सितारे आणि लाईटिंगस् लावून मी संपूर्ण घर सजविले. इतक्या वर्षाने माझें घर सजलेले बघून माझे डोळे पाणावले, पण पूर्ण काम होई पर्यंत थोडा उशीरच झाला होता, म्हणून मी पटकन तयार होऊन, खरेदीसाठी निघाली. मी भरपूर दुकाने फिरली कारण त्या चिमुकलीसाठी मला अगदी तिच्या इतकी गोंडस बाहुली हवी होती. तासंतास फिरली तेव्हा कुठे एका दुकानात एक छकुली बाहुली मिळाली. त्या बाहुलीची सुंदर अशी पॅकिंग करून घेतली व मी कारांज्याजवळील बस स्टॉप वर जाणारी बस पकडली.



कारंजेच्या जवळील बस स्टॉप वर माझी बस थांबली. मी बस मधून उतरून, लांबूनच ती चिमुकली मला दिसत आहे का ह्याची पाहणी केली. आज ही खूप लोकं गर्दी करून कारंज्याच्या अवती-भवती फिरत होती. सणाचा दिवस असल्यामुळे लोकांची गर्दी साहजिक होती. मी काही क्षण बस स्टॉपवर उभी राहून तिच्या येण्याची वाट पाहिली. जवळ जवळ दहा ते पंधरा मिनिटे माझे डोळे सतत कारंज्याकडे होते, नंतर सतत मी माझ्या हातावरील घड्याळाकडे बघत होती. काहीवेळ असाच निघून गेला तेव्हा माझ्या लक्षात आले की, ती नेहमी ज्या वेळेस मला दिसते त्यापेक्षा जवळ जवळ एक तास लवकरच पोहचली होती मी तिकडे, तिला कदाचित येण्यास उशीर असावा म्हणून बाजूच्या कॉफी च्या दुकानात जाऊन बसायचा विचार केला मी. तशी नाताळची सुट्टी असल्यामुळे कॉफी शॉपमध्ये प्रचंड गर्दी होती. मी माझी कॉफी घेतली आणि बसण्यासाठी जागा नसल्यामुळे दुकानातच कोपऱ्यात सजवलेल्या ख्रिसमस ट्री च्या बाजूला कॉफी पित उभी राहिली. समोर खिडकी असल्यामुळे मला जवळ जवळ कारंज्याचा अर्धाच भाग दिसत होता, पण जर ती चिमुकली आली तर मी जिथे उभी आहे तिथून ती मला नक्कीच दिसणार, अशी मी उभी होती. दहा मिनीटे झाली, पंधरा मिनीटे झाली, वीस मिनिटे झाली. मी उत्सुक तर होती पण थोडी चिंता ही होतीच. अवघ्या वीस मिनिटां नंतर मनात विचार आला, "आज ती नाही आली तर? आज सण असल्यामुळे ती तिच्या परिवाराबरोबर असू शकते किंवा ती आज बाहेर फिरायला जाऊ शकते, आणि जर ती आली समझा, तर मी तिला काय म्हणून ही भेटवस्तू देणार? तिचे आई वडील असले तिच्याबरोबर तर?" मी ह्या अश्या विचारांत हरवले असता एका पोराचा आवाज माझ्या कानी गुंजला, "एक्सक्यूझ मी मॅडम, आम्हाला जरा ख्रिसमस ट्री बरोबर फोटो काढायचा आहे, तुम्ही जरा बाजूला होता का प्लीज".  मी माझ्या विचारांच्या दुनियेतून निघून त्या पोराकडे जरा चिडूनच बघितले, शाळेतील मुलगा असावा, आपल्या काहीं मित्र-मैत्रिणींबरोबर होता कदाचित. पण प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर खूप आनंद झळकत होता. हे पाहून माझे ही मन प्रसन्न झाले. आता हे ख्रिसमस असल्यामुळे "ख्रिसमस स्पिरिट" जे म्हणतात ते होते की, माझ्याच उत्सुकतेमुळे मला सगळीकडे आनंद दिसत होता हे मला ही ठाऊक नव्हते. मी हळूच हसून "हो नक्कीच" असे म्हणाली आणि हातात असलेला कॉफीचा कागदाचा कप कचरा कुंडीत टाकून, कारंज्याच्या दिशेने निघाली.



कारंज्याच्या जवळील बहुतांश गर्दी आता बाजूच्या मॉल मध्ये सरकावली होती. तिकडे गाणी वाजत होती व जवळपास संगळ्यांसाठी कार्यक्रम सुरू होते. जास्त गर्दी नसल्यामुळे कारंज्याजवळचा परिसर शांत आणि प्रसन्न वाटत होता. काही लोकं होतीच तशी कारंजेच्या कठड्यावर बसलेली तर काही आजूबाजूने चालत जात होती. मी माझी नजर एकदा आजू बाजू च्या परिसरात त्या चिमुकलीच्या शोधात फिरवली. ती कुठेच न दिसल्यामुळे "अजून काही वेळ तिची वाट बघूया" हा विचार करून मी सुद्धा कारंजेच्या कट्ठड्यावर बसली. ती नेहमी मला जिथे बसलेली दिसायची मी बरोबर त्याच जागी  बसली. काहीवेळ निघून गेला, उत्सुकता मला होतीच पण माझें संयम मोडू लागले. तिकडे बसल्याजागी माझे डोळे सतत चारीबाजूस बघत होते, माझें शरीर मागे पुढे डोलत होते, पाय सतत जमिनीवर वाजवत, मी हळूच माझ्या हातात असलेल्या भेटवस्तू च्या पिशवीकडे पाहिले आणि त्यात असलेले गिफ्ट बाहेर काढले. त्या गिफ्ट कडे लक्ष जाताच मला एबीगेल बद्दलच्या काही जुन्या गोष्टी आठवल्या, एकदा मी आणि एबीगेल एका मोठ्या खेळण्याच्या दुकानात गेलो होतो. ती बहुतेक 3 वर्षाचीच असावी. मी तिच्यासाठी एक छानसा छोटासा टेडी बेअर शोधत होती. तितक्यात एबी कधी माझा हात सोडून गायब झाली मला कळलेच नाही. मला भान आले तेव्हा मी तिला कावरीबावरी होऊन शोधू लागली. माझा जीव अर्धा झाला त्या दुकानात तिच्या शोधात धावून. शेवटी ती मला सेल्स-गर्ल बरोबर भेटली. दुकानातच माझी एबी एका सेल्स-गर्ल बरोबर, घर घर खेळत बसली होती. चारी बाजूस तिने टेडी-बेअर, बाहुल्या, खेळण्यातली भांडी लावलेली, आणि जबरदस्ती बिचाऱ्या सेल्स-गर्ल ला पण स्वतः बरोबर खेळायला बसवले होते तीने. मला बघताच, गुलाबी फ्रॉक घातलेली एक छोटीशी बाहुली हातात घेऊन माझ्या दिशेने धावत आली आणि मला तिच्या नाजूक मधुर आवाजात बोलली, " मम्मा तू पण बस दीदी बरोबर, मी चहा बनवत आहे". खेळण्याच्या दुकानात सेल्स-गर्ल बरोबर मधोमध बसून घर-घर खेळणारी माझ्या एबीगेलच्या आठवणीने माझे डोळे पाणावले पण माझ्या होठांवर हास्य आणले.



कारंज्याच्या कट्टड्यावर त्या चिमुकलिची वाट पाहत बसली असताना माझी नजर माझ्या हातात असलेल्या गिफ्ट कडे गेली, हळूच हसताना मनात विचार आला, ' माझी एबीगेल माझ्या नजरेला दिसेनाशी झाली तेव्हा माझा जीव तळमळला, पण ती दुकानातच मला भेटल्यामुळे माझ्या जिवात जीव आला आणि मी सुखाचा श्वास घेतला. पण तेच जर कोणी अनोळखी व्यक्ती ने तिच्याबरोबर वाईट अथवा गैरव्यवहार केला असता तर? मग मी काय केले असते? कोण व्यक्ती जर तिला, तुला चॉकोलेट देते, गिफ्ट देते म्हणून घेऊन गेले असते उचलून, मग मी काय केले असते?" हा विचार मनात आला असता मला आठवले की, " मी ही तर त्या चिमुकलीसाठी गिफ्ट घेऊन येऊन इकडे बसली आहे. माझें तिला गिफ्ट देणे हे कितपत योग्य आहे? ना मी तिला, नाही तिच्या आई-वडिलांना ओळखते, तिच्याबरोबर माझें कधी काही संवाद नाही झालेत, ना मी तिला कधी ह्याआधी भेटली होती, तिची आई जर असली तिच्याबरोबर तर तिला ही हेच वाटेल की मी गिफ्ट्स देऊन लहान पोरं चोरणारी बाई आहे, कोण म्हणून मी तिला गिफ्ट देत आहे? आणि का म्हणून देत आहे? तिथेच कट्ठड्यावर ह्या सगळ्या विचारांमध्ये मी रमली असताना माझे डोळे पुन्हा पाणावले, पण ह्या वेळेस मात्र दुःखाने. मी गेले काही दिवस उत्सुक होती, आनंदी होती, पण मी जशी ही वागली ती खरोखरच अविचाराने आणि असमंजसपणाने.  माझ्या डोळ्यातले अश्रू गालावर पडत असतानाच मी चटकन उठून ऊभी राहिली. मला स्वतःचा खूप राग आला होता. मी माझी पर्स खांद्याला अडकवली, हातातले गिफ्ट कारंजेच्या कट्ठड्यावर ठेवले, आणि 'केवढा मोठा मूर्खपणा मी केला', असे स्वतःशी म्हणत, स्वतःला दोष देत दोनच पाऊले बस स्टॉप च्या दिशेने टाकली असताच, माझ्या हातावर मला एक मऊ स्पर्श जाणवला. मी पटकन मागे वळून पाहिले तर ती चिमुकली माझी करंगळी धरून उभी होती.




तिला बघताच माझ्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली, माझे डोळे जणू चमकू लागले व मनात आनंदाची लहर उमटली. मी पटकन तिच्यासमोर माझ्या गुडघ्यांवर बसली. माझा हात तिच्या हातावर ठेवला आणि उत्सुकतेने तिला विचारले, "ए छकुली, कोण आहेस ग तू? नाव काय ग तू...." माझें वाक्यं ही पूर्ण झाले नव्हते की तितक्यात एक बाई दम टाकत, धावत आमच्या दिशेने पळत आली, तिने त्या चिमुकलीचा हात आपल्या हातात घेतला व तिच्याकडे एक टक काळजीपूर्वक व थोडेसे चिडूनच बघत विचारले, " मॅडिसन, काय करत आहेस तू?"
त्या बाईला बघताच, मी उभी राहिली आणि तिला सांगितले की चिंता करण्याची गरज नाही, "इट्स ओके". त्या बाई ने मला निरखून पाहिले व तिने मला सांगितले की, ती त्या चिमुकली म्हणजेच मॅडिसनची आई आहे. तिची मुलगी मॅडिसन, तिला सगळ्यांबरोबर गप्पा गोष्टी करणे, खेळणे, खूप आवडते, मग ती व्यक्ती ओळखीची असो किंवा अनोळखी, म्हणून मॅडिसन बरोबर कधी बाहेर गेले की जरा सावध राहावे लागते, तिच्यावर जरा लक्ष ठेवावे लागते. तिचे हे बोलणे ऐकताच मी जरा अस्वस्थपणेच हसली. तिनेही क्षमस्वपणे हसत माझ्याकडे बघितले व म्हणाली, " मॅडिसनमुळे तुम्हाला जर काही त्रास झाला असला तर माफ... " तिचे वाक्यं पूर्ण होण्या आधीच एक तान्हा मधुर आवाज माझ्या कानात गुंजला, " मम्मा, हे बघ गिफ्ट". तो नाजूक आवाज माझ्या कानी पडताच, माझी नजर मॅडिसनच्या दिशेने वळली. त्या चिमुकलीच्या हातात मी कारंज्याच्या कठड्यावर ठेवलेले गिफ्ट होते. तिचे छोटेसे हात ती माझ्या दिशेने वर करत, तिचे गुबगूब्बीत गाल फुलवून, छोटेसे गुलाबाच्या पाकळीसारखे होंठ तिचे ती गोल करून, माझ्याकडे गोंधळलेल्या चेहऱ्याने बघत होती. तिला बघताच मी सगळे काही विसरून पुन्हा माझ्या गुडघ्यांवर बसली व तिच्या हातून ते गिफ्ट घेतले. गिफ्ट घेताच मॅडिसनने उत्सुकतेने टाळ्या वाजवत आणि हसत मला विचारले की, "आत मध्ये बाहुली आहे का?", हे ऐकताच मी हळूच माझे डोळे मिचकावून हसली आणि ती चिमुकली अजून उत्साही होऊन म्हणाली," मला बाहुल्या खूप आवडतात, माझ्याकडे खूप साऱ्या बाहुल्या आहेत घरी" तिचे हे बोलणे ऐकून माझें मन जणू आनंदाच्या समुद्रात डुबक्या मारत होते. इतकी गोंडस, गोजिरवाणी, गुबगूब्बीत व बोलकी होती मॅडिसन की कोणालाही तिचा पटकन लळा लागेल.




त्या चिमुकली समोर मी गुडघ्यांवर बसली असता, माझे हात मी मॅडिसन च्या दिशेने पुढे केले, एका हातात तिचा हात घेतला आणि मी तिला हळूच तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले, " हो! ह्या बॉक्स मध्ये तर एक अगदी तुझ्यासारखी, गोंडस, गुबगूब्बीत आणि बडबड करणारी बाहुली आहे. तुला पाहिजे असल्यास तू हे गिफ्ट ठेवू शकतेस". हे ऐकताच मॅडिसन चे डोळे मोठे झाले, खुदकन हसून तिने एक छोटीशी उडी मारली व नाचायला लागली. तिला बघून माझें ही मन अगदी आनंदाने बहरून गेले, इतक्यात तिच्या आईने तिला अडवले व माझ्याकडे बघत म्हणाली की, " माफ करा पण आम्ही हे गिफ्ट नाही घेऊ शकत". तिने मॅडिसन चा हात पकडला व चिडून मॅडिसन ला म्हणाली, " नो बेटा, चल घरी जायचा आहे आपल्याला". तिची चिंता मला ठाउक होती, शेवटी मी पण एक आई होती म्हणूनच मी पटकन उभी राहिली आणि तिला म्हणाली," तुमची चिंता मला कळत आहे. पण तुम्हाला घाबरण्याची व काळजी करण्याची काही गरज नाही. तुमच्या बद्दल माझे काही चुकीचे हेतू नाही पण हो, हे गिफ्ट मात्र खरच मी मॅडिसन साठी आणले होते". तिच्या चेहऱ्यावरची चिंता हळू हळू रागात तबदील झाली आणि हे साहजिकच होते, अनोळखी असून तिच्या पोरीसाठी मी गिफ्ट का म्हणून आणले, हे तीने मला जरा संतापूनच विचारले.




मी तिला अगदी पहिल्यापासून, जेव्हा मी मॅडिसनला पहिल्यांदाच पाहिले होते, तिथपासून आजच्या दिवसा पर्यंत जे काही घडले, ते सर्वकाही समजावून सांगितले, तिला सगळं काही सांगत असताना मी तिला कांरंज्याच्या कट्टड्यावर माझ्याबरोबर बसण्यास विनंती केली. ती मॅडिसनचा हात घट्ट पकडून व तिला आपल्याजवळ घेऊन, एकटक माझ्याकडे पाहत, माझं बोलणं ऐकत होती. मी तिला जे ही सांगितले ते तिला खरे तर वाटले, पण तिच्या पोरीसाठी गिफ्ट आणणे, ह्या मागचा हेतू काही कळला नाही तिला. तिने मला माझा हेतू विचारताच माझें डोळे पाणाविलें, माझी नजर मॅडिसन कडे गेली आणि मला माझी एबीगेल, मॅडिसन मध्ये दिसू लागली. मी माझे डोळे पुसून, हळूच हसली व मॅडिसनच्या आईला एबीगेल बद्दल सांगु लागली, "माझी स्वतःची मुलगी अबिगेल, अगदी मॅडिसन सारखी, तींसुद्धा असेच फ्रिल आणि रिब्बीन्स वाले फ्रॉक घालायची, केसात असाच हेअर-बँड घालायची. अशीच गुबगुबीत आणि बोलकी होती ती. 3 वर्षां आधी, ख्रिसमसच्याच दिवशी आम्ही शॉपिंग करून, खूपसारी खेळणी आणि कपडे घेऊन, संध्याकाळच्या वेळेस घरी परतत होतो. संध्याकाळ दरम्यान बर्फ पडायला सुरुवात झाली होती. म्हणून आधी विचार केला की थोडं थांबू , कुठच्यातरी रेस्टॉरंटमधून जेवून जाऊ घरी. पण एबीगेल च्या वडिलांचा सतत फोन येत होता की घरी ख्रिसमस साजरा करण्यासाठी जे सगळे पाहुणे येणार होते, ते आलेत, फक्त आता मी आणि एबीगेल राहिलेलो, आणि ते सगळे आमची आतुरतेने वाट पाहत होते, म्हणून जास्त विचार न करता मी माझी गाडी मॉलच्या पार्किंग लॉटमधून काढली आणि आम्ही घरी जायला निघालो. मी नेहमी एबीगेलला 'चाईल्ड सीट' मध्ये बसवून, तिला नीट सीटबेल्ट ने बांधून ठेवते. पण त्या वेळेस एबीगेल हट्ट करू लागली की बॅकसीट वर बसून नवीन खेळण्यांबरोबर खेळायच आहे. उशीर झालेला म्हणून जास्त वेळ वाया न घालवता, मी माझ्या एबी ला तिच्या नवीन खेळण्याबरोबर बॅकसीट वर बसवले आणि आम्ही घरी जाण्यास निघालो. बर्फ तर सतत पडतच होता आणि आम्ही जवळपास पोहचलो होतो घरी, पंधरा-एक मिनिटांचा प्रवास बाकी असावा बहुतेक जेव्हा मी एबीगेल सुखरूप आहे की नाही हे बघण्यास पाठी वळली, मी पाठी वळताच रस्त्यावर बर्फ असल्यामुळे गाडी रस्त्यावरून सरकावली गेली आणि रस्त्याच्या कडेने असलेल्या झाडाला जाऊन धडकली." इतकं बोलताच माझ्या डोळ्यातले अश्रू वाहू लागले. माझा संयम सुटून मला रडू आले, आणि हुंदके देत मी पुढे बोलण्याचा प्रयत्न करत होती, मॅडिसनच्या आईच्या चेहऱ्यावरसुद्धा, माझी कहाणी ऐकून, तिच्या मनाला लागलेला धक्का स्पष्टपणे दिसून येत होता. तिने माझ्या हातावर मला सहानुभूती देत आपला हात ठेवला. माझ्या पाणावलेल्या डोळ्यांनी मी तिला पाहिले व तिची माफी मागत तिला सांगितले की, "माझा कधीच चुकीचा हेतू नव्हता मॅडिसन बद्दल आणि मी मॅडिसन ला काही करणार नव्हती. त्या चिमुकलीला बघून तर माझें मन प्रसन्न होई म्हणून मी तिच्या साठी भेट म्हणून बाहुली आणली". मी तिला सांगितले की, "ख्रिसमस चा सण मी गेले तीन वर्ष साजराच केला नव्हता. एबीगेल गेली आणि तिच्याबरोबर माझें पूर्ण आयुष्यही उध्वस्त झाले. ती गेली आणि माझ्या आयुष्यातून ही सगळे हळूहळू दूर गेले. मी ही स्वतःला कामात झोकून दिले. माझ्यासाठी सगळे दिवस एक सारखे झाले होते ". मी तिला हे देखील सांगितले की कसे मॅडिसनला रोज बघून माझे मन प्रसन्न होई, तिच्यात मला माझ्या एबी ची छबी दिसे, तिच्या मुलीने माझ्या मनाला नुसते प्रसन्न नाही केले तर खुश राहण्याची, जगण्याची एक आशा ही दिली. ख्रिसमस स्पिरीट ज्याच्यात माझा विश्वास नष्ट झालेला तो विश्वास परत दिला. माझें बोलणे ऐकताच, मॅडिसनच्या आईने माझ्या पाठीवर सहानुभूतीचा हात फिरवला. 




काही क्षण, शांत, न बोलता आम्ही करंज्याच्या कट्ठड्यावर बसून राहिलो. मला थोडे विचित्रच वाटत होते कारण मी कधी असे मन मोकळे करून इतक्या वर्षात कोणालाच काही बोलली नव्हती. माझी एबी गेली, त्या नंतर बाकीच्या नात्यांमध्ये सुद्धा दुरावा आला आणि हळू हळू माझ्या आयुष्यातून सगळे जवळचे लोकं सुद्धा निघून गेले. ते असे काही दूर झाले, जणू जे काही झाले ते मी मुद्दामहून केले होते, सगळ्यांनी मलाच दोष दिला, ह्यात कोणाच्या लक्षात हे आलच नाही की, मी सुद्धा स्वतःलाच दोष देत होती, मी ही माझी मुलगी गमावली होती आणि मी पण अतिशय दुःखात होती. खूप वर्ष लागली मला सुध्दा, पण मी माझं स्वतःला सावरलं, आणि कामात मग्न झाली. इतकी वर्ष विचारकरण्याची ही सूट दिली नव्हती मी स्वतःला. मी माझ्या जीवनातील घडलेल्या ह्या माझ्या अश्या दुर्दैवी क्षणाबद्दल सांगताना, माझं लक्ष मॅडिसन कडे गेलं. ती तिच्या आईचा एक हात पकडून, माझ्याकडे बघत, शांत उभी होती. तिच्या छोट्याश्या मुठीत तिने काहीतरी घट्ट पकडून ठेवले होते. मॅडिसन ने एकदा आपल्या हाताकडे लक्ष फिरवले, मग आपल्या आई ला बघितले, तिची आई तिच्याकडे बघून हसली व तिचा हात सोडून तिला माझ्याजवळ जाण्यास इशारा केला. मी माझे डोळे पुसत थोडेसे हसून तिच्याकडे पाहत होती, मॅडिसन दोन पाहुले पुढे आली, तिच्या मुठीत असलेलं एक नाणं माझ्या हातात ठेवून मला म्हणाली, "मावशी हे घे, हे ना जादूई नाणं आहे, आणि हा कारंजा आहे ना, हा पण जादूई आहे, मला माझ्या मम्मा ने सांगितले ", तिचे हे बोलणे ऐकताच मी गोंधळून तिच्या आईकडे पाहिले, तिची आई माझ्याकडे बघून हसली, म्हणून मी पुन्हा मॅडिसनकडे पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन तिला ती नक्की काय बोलत आहे हे विचारले. मॅडिसन ला काही माझें गोंधळने कळलेच नाही आणि ती उत्सुकतेने पुढे बोलतच राहली, "हे नाणं ना तुम्ही ह्या जादूई कारंज्यामध्ये टाका, आपले डोळे बंद करा आणि एबीगेल परत येउ दे अशी इच्छा मागा, मग तुमची एबीगेल परत येणार, जसा माझा छोटा भाऊ परत आला".  तिचे शेवटचे वाक्य ऐकून मला जणू धक्काच बसला, "भाऊ परत आला?", हे कसे शक्य आहे? मी तिच्या आईकडे जरा हादरून आणि गंभीरपणेच बघितले व तिला विचारले की, "हे मॅडिसन काय बोलत आहे नक्की?" तिच्या आईने मॅडिसन ला अजून एक नाणं दिलं आणि बाजूला जाऊन खेळायला सांगितले.




मी अजूनही तिच्या आईकडे जरा आश्चर्यानेच बघत होती जेव्हा ती मला ह्या जादूई कांरंज्यामागची गोष्ट सांगू लागली, "दोन वर्षा पूर्वी जेव्हा मी गरोदर होती, सगळे खूप खुश होते. मॅडिसनचा छोटा भाऊ येणार आहे म्हणून त्याच्या बेडरूम पासूनची सगळी तैयारी केलेली. मॅडिसन ने तर नावं सुद्धा सुचवून ठेवली होती ". हे सगळं मला सांगत असताना तिने हळूच मॅडिसन कडे बघितले, मग हळूच जमिनीकडे निराशाजनक बघत मला म्हणाली की, "पण काही मेडिकल कम्प्लिकेशन मुळे तो जन्मआधीच..." इतके बोलताच तिने वर आकाशाकडे पाहिले आणि स्वतःच स्वतःला धीर देत, ती पुढे बोलणारच असता मी लगेच माझा हात तिच्या खांद्यावर ठेवला, तिला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करत मी तिला बोलली की, "इट्स ओके, मला माफ कर, मला हे नाही विचारायला हवे होते". डोळ्यात अश्रू घेऊन सुद्धा ती हळूच हसत, माझ्याकडे बघत मला म्हणाली की, "हो! दुःखद गोष्ट आहे, पण आमच्या मनाला ह्या गोष्टीचा आघात जेवढा झाला, त्याच्या दुप्पट मॅडिसनला झाला होता. आम्ही स्वतःला सावरलं पण मॅडिसन वर ह्या गोष्टीचा खूप परिणाम झाला होता. तिला अश्या अवस्थेत मला बघवत नव्हते, म्हणून एक दिवस मी तिला ह्या कारंज्याकडे घेऊन आली आणि तिला सांगितले की हा एक जादूई कारंजा आहे. तिला नाण दिलं आणि डोळे मिठुन नाणे पाण्यात टाकून, इथे कठड्यावर बसून तिचा भाऊ परत येउ दे अशी इच्छा मागण्यास सांगितले. काही दिवसाने माझी मॅडिसन पुन्हा पहिल्या सारखी हसू खेळू लागली, ह्या वर्षी जेव्हा मी पुन्हा गरोदर झाली तेव्हा तिला वाटले की हे नक्कीच ह्या जादूई कारंज्याची कमाल आहे आणि ती रोज नाणी घेऊन कारंज्याजवळ येऊ लागली". हे ऐकताच मला हसू आले आणि माझ्या मनात आले की निरागस लहानमुलांसाठी खुश होणं आणि ह्या जगात खरच काही जादूई आहे ह्यात विश्वास ठेवणं किती सोप्पं आहे. आपण वयाने मोठे असून पण दुःखद गोष्टी मनात ठेवून सतत दुःखाचे संगोपन करत असतो आणि ही छकुली निरागस पोरं अस्तित्वात नसलेल्या गोष्टींवर सुद्धा विश्वास ठेवून खुश होऊन बागडत असतात.




मॅडिसन च्या आईने स्वतःच्या पोटावर हात फिरवत माझ्या कडे बघितले. तिच्या चेहऱ्यावर तेज होते, तिने हसतच मला सांगितले की, पुढच्या काही महिन्यात मॅडिसन चा छोटा भाऊ जन्माला येणार आहे. मी लगेच म्हटले "जादूई करांज्यामुळे ना?" आणि आम्ही दोघी हसलो




आम्ही दोघी पाणावलेले डोळे पुसत आजच्या ह्या दिवसात झालेल्या भेटीबद्दल हसत बोलत बसलो होतो, तितक्यात मॅडिसन कडे माझें लक्ष गेले. ती कारंज्याच्या कठड्यावर, मी आणलेला गिफ्टचा बॉक्स उघडून, आत असलेल्या बाहुलीबरोबर खेळत बसली होती. तिला खेळताना पाहून मी त्या दोघांना ते गिफ्ट ठेवण्यास आग्रह केला. आम्ही सगळ्यांनी एकमेकाला मिठीमारून ख्रिसमस च्या शुभेच्छा दिल्या आणि आप-आपल्या घरी निघून आलो.




आज ही ऑफिसवरून सुटल्यावर, मी माझी नेहमीचीच बस पकडते, आज ही ती चिमुकली मला कारंज्याच्या कठड्यावर एक छानसा रिब्बीन्स असलेला फ्रॉक घालून, केसं पोनीटेल मध्ये बांधून, डोक्यावर वेगवेगळ्या रंगांचे हेअर-बेंड घालून आणि हातात तिच्याच इतकी, तिला मी दिलेली, गोंडस बाहुली घेऊन बसलेली दिसते. माझी बस कारंज्याच्या जवळील बस स्टॉप वर थांबली की मॅडिसन मला नेहमी टाटा करताना दिसते, कधी कधी तिचा छोटा भाऊ ही असतो तिच्याबरोबर. आजही, कधीतरी मीच बस मधून उतरून तिच्या जवळ जाते, मग आम्ही दोघी तिच्या बाहुलीबरोबर कारंज्याच्या कट्ठड्यावर बसतो आणि काही नाणी घेऊन त्या जादूई कारंज्यात टाकतो आणि खूप साऱ्या इच्छा मागतो..